माझ्यासारखे खुपजण नव्या वर्ष्याच्या सुरुवातीस काही न काही संकल्प करत असतात. त्यातील काहींचाच संकल्प पूर्ण होतो आणि उरलेल्यांच्या यादीत माझ्यासारखे भरपूर भेटतील..
याही वर्षी २० ते २५ नवीन गडकिल्ले, धारातीर्थे आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याचा संकल्प केला होता पण तो पुन्हा अयशस्वी ठरला.
परंतु ह्या भटक्याची भटकंती थांबली नाही. ह्या वर्षी सर्वात चांगली गोष्ट अशी घडली कि गडवाट सारखा गडदुर्गांची ओढ असलेला परिवार मिळाला. अगोदर कोणत्याही ट्रेकिंग ग्रुपसोबत किल्ले फिरायचो किंवा मित्रांसोबत जायचो. आता हक्काचा परिवार मिळाला ज्यातून गडभ्रमंती सोबत समाजकार्याची ओढ लागली. . असो.
ह्यावर्षी किल्ल्यांमध्ये वासोटा किल्ला , धारातीर्थांमध्ये तुळापुर (५वेळा) आणि धार्मिक स्थळांमध्ये शेगाव या नवीन ठिकाणाची भटकंती झाली तर या आधी पाहिलेल्या किल्ल्यांवर पुन्हा भटकंती केली.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीतील गडकिल्ले त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत अजूनही तग धरून उभे आहेत.
मी गडकिल्ल्यांवर का फिरतो हे मलाच न उलगडलेले कोडे आहे. अजूनही आठवतंय ३१ डिसेंबर २००४ साली कॉलेजला बंक मारून आम्ही काही मित्र मलंगगडला गेलो होतो. तेव्हापासून हि भटकंती सुरूच आहे.
आता ३१ डिसेंबर २०१२ रोजी माझ्या भटकंतीची ९ वर्षे पूर्ण होतील.
गेल्या ९ वर्षात खूप चांगले वाईट अनुभव आले. नवनवीन सह्यामित्रांची ओळख झाली. गावागावातून फिरताना तिथल्या परिस्थितीची जान आली. आदिवासी पाड्यात राहताना भीती काय असते आणि दारिद्र्य काय असते हे जवळून अनुभवायला मिळाले. ह्या सह्याद्रीचे वेगवेगळे रांगडे रूप प्रत्येक ऋतूत पहावयास मिळते कधी हिरवागार शालू पांघरून, कधी मखमली साज चढवून तर कधी सोन्यासारखा शृंगार करून. पावसाळ्यात धो धो पडणारा पाऊस, हिवाळ्यात कडकडून वाजणारी थंडी आणि उन्हाळ्यात अंगावर बसणारे चटके कसे असतात हे सह्याद्रीकडून अनुभविले.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि स्वावलंबीपणा सह्याद्रीमुळेच शिकायला मिळाला. Management कसे केले पाहिजे ह्याचाहि अनुभव सह्याद्रीने दिला. हा सह्याद्रीचा प्रवास यापुढेही असाच चालू राहणार. नवनवीन गडकिल्ले पादाक्रांत करणे हाच माझा छंद राहील.
ह्या भटकंती मागे माझ्या ईश्वरसम आई वडिलांची साथ खूपच मोलाची आहे .
मी आभारी आहे ह्या सह्याद्रीचा जो त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्त बागडू देतोय. माझा प्रत्येक तोल सावरतोय. ज्याने त्याच्या उदरात वसलेल्या गडकिल्ल्यांचे वेड लावलय..
मी आभारी आहे माझ्या काही जुन्या तसेच नवीन मित्रांचा ज्यांच्यामुळे हा छंद जोपासण्यासाठी मदत होते आहे.
"हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच रौद्र हि आहे.
तो आधीच जाणीव करून देतो.
काय करायचं काय नाही करायचं त्याची
शेवटी तो माझा गुरु आहे"
माझ्या काही नव्या व जुन्या भटकंती सहित लवकरच येईल.
Comments
Post a Comment