Skip to main content

तोरणा ते राजगड प्रवास सह्याद्रीचा भाग-५


१ जानेवारी ची रम्य पहाट उजाडली. पहाटेचे सहा वाजले होते. आज सगळे न सांगता झोपेतून उठले होते. आता लक्ष होते सुवेळा माची. नवीन वर्षाचा सूर्योदय पाहायला सगळेच आतुर झाले होते. सामानाची बांधोबंध करायला अर्धा तास लागला. सर्वांच्या Sack मंदिरात एकाच ठिकाणी ठेवून आम्ही सुवेळा माचीकडे चालायला लागलो. अंधाराची चादर काढून तो सहस्त्ररश्मी कधी येतोय असे सगळ्यांचे झाले होते. अर्ध्या तासात आम्ही सुवेळा माचीला पोहोचलो. हळूहळू पूर्वेकडचे आकाश गुलाबी रंगात उजळू लागले. तो लालबुंद गोलाकार तुकडा क्षितिजावर हळूच डोकावू लागला. वर सरकू लागला. क्षणार्धात आकाशात वर झेपावणारा तो तेजोनिधी लोह गोल पाहून सारे हरखले. मग काय, सर्वांचे कॅमेरे सुरु झाले तो क्षण टिपण्यासाठी. त्यात धुक्याची चादर पांघरलेला सह्याद्री अजून निद्रेतच आहे कि काय असा भास होत होता. धुक्यात हरवलेल्या सह्याद्रीचे रुप विलक्षण दिसत होते. त्यात सुवेळा माचीवर पडणारी सूर्यकिरणे मोहून टाकत होती. सुवेळा माचीच्या बुरुजावरून सगळेजण सूर्योदय पाहत होते.. तसा तो दिनकर हळू हळू वर सरकू लागला. घड्याळात ८ वाजलेले कळलेच नाही. आता लक्ष होते बालेकिल्ल्याचे पण थोडीशी पेटपूजा करावी असा ठराव मंजूर झाला आणि पुन्हा सर्वजण पद्मावती कडे मार्गस्थ झाले. मी , नंद्या, जयदीपराव, विनायक आणि वैभव काळेश्वरी बुरुजामार्गे पद्मावती कडे निघालो व बाकीचे आल्या वाटेने निघाले. आम्ही काळेश्वरी फिरून त्यांना थोड्याच वेळात गाठले. गुंजवणे दरवाजा पाहायला खाली उतरलो आणि पुन्हा पद्मावतीकडे निघालो. आता वेळ करून चालणार नव्हता. पद्मावतीला पोहोचायला आम्हाला ९ वाजले. सर्वाना पटापट नाश्ता करावयास सांगितले. आज संकष्टी होती आमच्यापैकी अमर आणि सुशांत बंधूंचा उपवास होता. हे दोघे उपाशीच राहणार होते. ते दोघे सोडून बाकीच्यांनी नाश्ता केला आणि बालेकिल्ल्याकडे मार्गस्थ झालो. घड्याळात ९.३० वाजले असतील. आम्ही चालायला सुरुवात केली. बालेकिल्ल्याची उभी चढण हि दमछाक करणारी असल्याने सर्व हळू हळू चालत होते. काही वेळातच आम्ही बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येवून थांबलो. पुन्हा निसर्गचित्र आणि फोटोग्राफी साठी सर्वाना वेळ दिला. त्यात पंक्या आणि सुशांत भाऊंची लाठीकाठी स्पर्धा सुरु झाली आणि संपलीही. आता थाबुन चालणार नव्हते सूर्य डोक्यावर येवू लागला होता. उन्हामुळे तहान लागायला सुरुवात झाली होती. बालेकिल्ला फिरताना राजवाड्याच्या समोर आमच्यातील काही जणांना मण्यार जातीच्या सापाचे पिल्लू दिसले आणि सगळी फौज तिथे थांबली. नुसता गलबला झाला होता सर्वांचा त्या सापाच्या बाजूने. तर काहींनी त्याचे फोटो टिपायला सुरुवात केली होती. कसेबसे एकेकाला दामटवत हळू हळू पुढे सरकली. काही वेळातच बालेकिल्ला पाहून झाला. बालेकिल्ल्याहून दिसणारे आजूबाजूचे किल्ले सर्वाना दाखवले आणि बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.
१५ ते २० मिनिटात आम्ही पद्मावती मंदिरात पोहोचलो. तेव्हा तिथे साताराहून नितीराज आणि अभिजित बंधू आले होते. त्याच्याशी सर्वांच्या गाठीभेटी झाल्या. ते बालेकिल्ला करून आम्हाला पाली गावात पुन्हा भेटणार होते. नियोजनानुसार खूप उशीर झाला होता. पाली गावात आम्हाला जेवण करून पुण्याकडे रवाना व्हायचे होते. सर्वाना चांगलीच भूक लागली होती. राम आणि विक्रांत खूप दमल्यामुळे बालेकिल्ल्यावर आले नव्हते. पण आम्ही येईपर्यंत त्यांनी मंदिरातील मूर्ती पाण्याने धुवून पूजा केली होती व मंदिरात झाडू मारून साफसफाई केली होती. तसे मंदिरात आल्या आल्या सर्वांनी लगोलग sack खांद्यावर टाकल्या. राहुलची गारद झाली आणि आम्ही पाली दरवाजामार्गे गड उतरायला सुरुवात केली. आता सगळ्यांचे पाय ढिले झाले होते तरी पटापट गड उतरत होते. सर्वात शेवटी मी व राहुल मागे राहिलो. मधेच आम्हाला लहर आली कि न थांबता पळत पळत गड उतरायचा. घड्याळात वेळ पाहिला नि आमची सुरुवात झाली. एका मागोमाग एक आम्ही दोघे सुरु झालो. मधेच छोटा बापू पण सामील झाला. पाली दरवाजापासून आम्ही न थांबता १० ते १५ मिनिटात गड उतरलो. व पाली गावात आलो. काहीजण आमच्या आधीच पोहोचले होते. त्यांनी अंघोळ करण्यासाठी नदीची वाट धरली होती. पाली गावातून काही अंतरावर असलेल्या त्या नदीत पोहायला सुरुवात केली होती. हळू हळू सगळेच सामील झाले. तब्बल ३ दिवस अंघोळीविना आम्ही राहिलो होतो. ह्या ३ दिवसात अनोळखी असलेल्यांची चांगलीच मैत्री जमली होती. सगळ्यांनी चांगली मस्ती केली. नदीत सर्वजण मनसोक्त पोहले. त्यात पोहाल्यामुळे भुकेने हैराण केल होत.
काही वेळातच सर्वजन गावात आलो. आपले गडवाटकरी नानासाहेब धुमाळ यांच्या घरासमोर आमची पंगत बसली. आजचा मेनू बटाटा वांग्याचे कालवण, भाकरी, वरण-भात आणि लोणचे व ठेचा हा होता. अमर मोरेंचा उपवास होता त्यांनी फराळ केला. पण सुशांत भाऊंची मात्र भूक अनावर झाली होती म्हणून उपवास सोडला आणि पंक्तीत येवून जेवायला बसले. सर्वजण पोटभर जेवले. पाली गावातून एसटी नसल्याने वडापच्या गाड्या मागवल्या. गाड्या येईपर्यंत सगळ्यांनी धमाल केली. नितीराज बंधूची Willys jeep सोबत सगळ्यांनी फोटो काढले. काही सातारचे मंडळी त्या जीपने सातारला गेले. थोड्याच वेळात आम्ही बोलाविलेल्या गाड्या आल्या. सगळे जन गाडीत बसले आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. खूप काही गोष्टी डोळ्यात साठवत आम्ही निघालो होतो.
तोरणा ते राजगड प्रवास सुखाचा झाला होता. जवळपास ५१ जन या सह्यभ्रमंती मध्ये सहभागी झाले होते. या खडतर प्रवासात एकालाही कुठली इजा किंवा दुखापत झाली नव्हती. याचा अभिमान वाटतो. ह्या संपूर्ण प्रवासात आबासाहेब कापसे, राम गिड्डे , राहुल बुलबुले, सुशांत गुंड, बापू पवार , शंकर सापते  यासहीत संपूर्ण गडवाट परिवाराची साथ लाभली.
ह्या लेखाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा माझा उद्देश. जेणेकरून गडकिल्ल्यांविषयी लोकामध्ये आवड निर्माण व्हावी. ट्रेकिंगच्या माध्यमातून का होईना त्यांना भेट देत चला.
तुम्हाला इतिहास ऐकायचा असेल तर त्या त्या गडांच्या चिरेबंदी बुरुजाला कान लावून ऐका.
"तुम्हाला आवाज येईल त्या आर्त किंकाळीचा. ..
तुम्हाला आवाज येईल खनाननाऱ्या तलवारीचा... 
तुम्हाला आवाज येईल बुरुजावरून धडाडनाऱ्या तोफांचा..  
तुम्हाला आवाज येईल त्या शूर मावळ्यांचा "हर हर महादेव..हर हर महादेव.. हर हर महादेव.. " 
यासाठीच हा लेखनप्रपंच.
।। जय शिवराय ।।
- जातिवंत भटका

Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...