Skip to main content

विकट वाटेने विकटगड (पेब) भाग-१

पावसाळा आला म्हटले कि सह्याद्रीत भटकायला निसर्गप्रेमींची विकेंडला झुंबडच्या झुंबड लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर सारख्या निसर्गाने समृद्ध अशा ठिकाणी पाहताना मिळते. धो धो पडणारा पाऊस, उंचच उंच कड्यावरून खळखळत कोसळणारे शुभ्र धबधबे, हिरवागर्द शालू पांघरलेला सह्याद्री, गर्द धुक्याने वेढलेले डोंगरदरे, गडकिल्ले, रानवाटा पायी तुडवताना येणारा अनुभव रोजच्या धकाधकीच्या जीवनातला थकवा दूर करतो. अशातच आमच्यासारख्या शहरातील भटक्यांसाठी जवळपासचे गडकिल्ले साद देतात. मग प्लान ठरतो. कुठे?  कधी? किती वाजता ? सगळ काही नियोजनपूर्व फेसबुकवर ठरते. फोनाफोनी होते. ट्रेकच्या वेळेत कोण उशिरा येते तर कोण टांग देते. सगळे एकत्र आले रे आले कि नाश्ता पाणी उरकनेका आणि ST किंवा वडाप पकडनेका ठरलेले असते. सर्वांचे मिटिंग स्पॉटसुद्धा ठरलेले असतात. मोठ्या फुशारकीने सकाळी ट्रेकला आलेले टवटवीत चेहरे ट्रेक संपल्यावर संध्याकाळच्या वेळेत खड्डे खोडून आलेल्या माणसावाणी होतात. "बोलते हे ना कुत्तेकी शेपूट पाईप मे डालो किंवा काठी से बांधो वाकडी ती वाकडीच रहती हे" तसेच ट्रेकर्स चे सुद्धा असते. कितीही कठीण ट्रेक असला किंवा त्याच्यासोबत काही अपघाती प्रसंग घडला असला तरी तो डोंगरदर्यात बोंबलत भटकताना दिसणारच. सह्याद्रीने लावलेले व्यसन यालाच म्हणतात. पण त्या त्या ट्रेकचा अनुभव कायम मनात साठवून हे भटके पुन्हा नवीन प्लान कधी ?  असे बोलून पुन्हा तयार झालेले असतात.

आमचा नुसताच त्रिंगलवाडी ट्रेक झाला होता. आता पुढचा ट्रेक होता विकटगड. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालणे आम्हाला आवडते. "कुछ तो हटके करनेका"  त्याप्रमाणे पेबचा किल्ला नवीन वाटेने करायचा माझा प्लान फिक्स झाला. पनवेल मार्गे आदिवासी पाड्यातून गडावर जाणारी एक वाट आहे असे चंदेरीच्या ट्रेकला कळले होते. मग याच वाटेने पावसाळ्यात हा ट्रेक करायचा ठाम निर्णय घेतला होता. माहिती काढायला सुरुवात केली. आधीच कोंबलटेकडी या किल्ल्याच्या पायथ्याचे गावात जावून गडावर जाणाऱ्या वाटेची माहिती काढून आलो. आणि तारीख फिक्स झाली. आम्ही पनवेलमार्गे किल्ल्यावर जावून नेरळमार्गे उतरणार होतो.  

नेरळ आणि माथेरान मार्गे पेब किल्ल्यावर येण्यासाठी ३ वाटा आहेत. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि मुंबईकरांना माथेरान अगदी जवळ… त्यामुळे काही हौश्या नवश्याचे पाय या किल्ल्याकडे हमखास वळतात. विकेंड मध्ये पेबला येणाऱ्या लोकांची संख्या जवळपास ५००-६०० च्या आसपास असते. म्हणजे विचार करा कितना ट्राफिक जाम होता होगा… खूप साऱ्या ब्लॉगवर तसेच गडभ्रमंती माहिती पुस्तकात आम्ही जाणाऱ्या वाटेचा उल्लेख नव्हता. कोंबलटेकडी गावातून आमचा गडवाटचाच ग्रुप पहिल्यांदा ट्रेक करणार होता. माझाही या वाटेवरून पहिल्यांदा ट्रेक होता त्यामुळे गावातला वाटाड्या बाळू ला सोबत घेतला. (मला एक प्रश्न पडलाय गडाखाली असलेल्या गावातील वाटाड्याचे नाव "बाळू" च का बरे असते ?) 

रविवारी सगळ्यांना पनवेल ST डेपोत यायला सांगितले. मी, Sandy दादा, रवींद्र एकत्र पनवेलला जाणारी ट्रेन पकडली, त्यात विक्रांत, मनीन आणि अनिकेत खारघरला भेटले. तर काहीजण मागे पुढे होते. ७ वाजता पनवेल स्टेशन गाठले. दिनेश, शेखर, विशाल, रेणुका, आदित्य हा लवाजमा घेवून डेपोकडे वाटचाल सुरु केली. एकेकाचे फोन येत होते. डेपोत पोहोचलेल्या सर्वाना ५ मिनिटांचा अवधी दिला. काही वेळातच पोहोचलो. किरण, राहुल, देवेंद्र, मल्हार, रवि, व्यंक्या, प्रशांत हांडे यांची भेट झाली. उशिरा येण्याचा हातकंडा असलेले उशीरच आले. त्यांच्या समाचार शिव्यांच्या स्वागताने केला. ८ वाजवल्या या बहाद्दरांनी… हॉटेल विसावा मध्ये सर्वांचा चहापाणी नाश्ता उरकला. ९ ची मालडूंगे ST पकडली. ST बसल्या बसल्या गप्पांना उधान आले होते. हसत खिदळत अर्ध्या तासांचा प्रवास झाला. बरोबर ९.३० ला मालडूंगे गावात पोहोचलो. उतरताना पावसाने सर्वांचे जोरदार स्वागत केले. अगदी शांत वातावरण, आजूबाजूचा मनमोहक निसर्ग, माथेरानच्या डोंगरावरून पडणारा एक मोठा धबधबा, गाडेश्वर धरण, माथेरानचा Sun सेट Point सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. भन्नाट वारा आणि पावसाचे मनोमिलन होवून अडवातीडवा वाटेल तसा पाऊस पडत होता. काही वेळातच धुक्याने धबधबा झाकोळला गेला. सगळ्यांना एकत्र करून सर्वांची ओळखपरेड केली. विठ्ठल आणि बापूला पुढे केले. पावसाने Time Please घेतला. मग काय काढले कॅमेरे आणि क्लिकक्लीकाट सुरु झाला. चढण लागली तसे हुरळून गेलेले ट्रेकर्स हळू हळू चालू लागले. दम खात, गप्पा मारत प्रत्येकजण एकामागोमाग एक कोंबलटेकडीच्या दिशेने पाऊले टाकत होता.
क्रमश: 

Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...