६ जून २०१४ शिवराज्याभिषेक सोहळा - मराठ्यांच्या इतिहासातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. रायगडावर याच दिवशी ३४० वर्षांपुर्वी शिवाजी महाराज सार्वभौम राजे झाले होते. इतक्या वर्षांनंतरही अगदी त्याच जोमात महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर साजरा केला जातो. मीसुद्धा गेली २ वर्षे न चुकता आपली हजेरी रायगडाच्या दरबारी लावत आलो आहे. यावर्षी सुट्ट्यांच्या घोळामुळे रायगडी जाणे तसे साशंक वाटत होते, पण अगदी शेवटच्या क्षणी आलेला एक phone call सगळी समीकरणे बदलून गेला. रायगड पुण्याहून गाठायचा ठरले तेही एक दिवस आधीम्हणजे ५जून ला. लवकर जाण्याचे एक मोठे कारण होते ते म्हणजे रायगडाची प्रदक्षिणा. ठरल्याप्रमाणे सर्व (विशाल नाईकवाडी, बोम्बल्या फकीर, मी आणि माझा भाऊ) ११.३० पर्यंत रायडाच्या पायथ्याशी भेटणार होतो. पण कुठे माशी शिंकली कोण जाणे १ वाजले तरी या दोघांचा काही पत्ता नव्हता. mobile network फारच weak असल्याने संपर्क करणे तसे कठीण होते. वाट बघण्याशिवाय कोणता पर्याय आमच्याकडे नव्हता, माझा भाऊ आणि मी बराच वेळ चित्त दरवाजासमोर उभे राहिलो. अखेर ३.३० वाजता या लोकांची गाडी आमच्यासमोर आली. सुटकेचा निश्वास टाकत जास्त वेळ वाया न घालवता आम्ही योग्य ती विचारपूस करून मग प्रदक्षिणा सूरू केली. १६-१८ किमीचा खडतर प्रवास आम्हाला शक्य तितक्या लवकर पूर्ण कारायचा होता. प्रदक्षिणेची सुरवात चित्त दरवाजापासूनच केली जाते. चित्त दरवाज्याच्या डाव्या बाजूने सुरवात करून मग पूर्ण फेरी मारून परत चित्त दरवाजात आल्यावर आमची प्रदक्षिणा पूर्ण होणार होती. पाऊस अजून सूरू न झाल्याने पाण्याच्या आवश्यक तेवढ्या bottles भरून मग आम्ही चौघांनी चालायला सुरवात केली.
दुपारचे ४ वाजून गेले होते. गावकरी तर भुवया उंचाऊन आमच्याकडे बघत होते. काही अंतर चालल्यावर टकमक टोकाच्या अगदी खाली असलेल्या रायनाक महाराजांच्या समाधीजवळ काही वेळ थांबून आम्ही पुढे निघालो. वाटेत बऱ्याच फुलांची, फळांची तसेच औषधोपयोगी झाडे लागत होती. आंबा, फणस, करवंद, जांभुळ या अशा अनेक फळांचा आस्वाद घेत आम्ही पुढे जात होतो. बोम्बल्या सोबत आहे म्हंटल्यावर विविध विषयांवर चर्चा सतत चालू होत्या. मध्येच camera टकमक टोकाची कधीही न पाहिलेली बाजू capture करित होता. हवेचासुद्धा शिरकाव होणार नाही एवढी गर्द वनराई होती ती. पाण्याच्या बाटल्या हळूच बाहेर निघत होत्या. समद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ असल्याने रायगडाच्या हवामानात आर्द्रता फारच होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. प्रदक्षिणेच्या मार्गावर ठराविक अंतरावर पिवळ्या तैलरंगाने ठिकठिकाणी दिशादर्शक बाण आखण्यात आले आहेत. ते नसते तर आमची रात्रीची प्रदक्षिणा कदाचित सकाळी संपवावी लागली असती. एका ठिकाणावर कुडाची एक झोपडी बनवण्यात आली होती. तिथून दिसणारे टकमक टोक अगदी विलोभनीय वाटत होते. Camera मध्ये त्याला कैद करून पुन्हा प्रवास चालू केला. झाडाझुडपातून चाणारी पाऊलवाट पुढे अशा ठिकाणी आणून सोडते की आमच्या सर्वांच्या मनात समोरचे दृष्य पाहण्याची नुसती धांदल उडून जाते. माझा dream trek असणारा साक्षात लिंगाणा आम्हाला अगदी डोळ्यांसमोर दिसतो.
लिंगाणा म्हंटलं की पावलं आपोआप थबकतात त्याचं ते आक्राळविक्राळ रूप पाहण्यासाठी. रायगडी जेव्हा-जेव्हा गेलोय तेव्हा तेव्हा भवानी टोकावरून लिंगाण्याकडे पाहून त्याला सर करण्याचं स्वप्न मी पाहिलं आहे. तिकडून लिंगाणा फारच लांब वाटतो पण प्रदक्षिणा घालताना मात्र तो असा अगदी तोंडासमोर येईल याची कल्पनाच नव्हती. लिंगाणाची भुरळ काही केल्या कमी होत नव्हती. कसाबसा काढता पाय घेतला आणि पुढे निघालो. आता पुन्हा अनपेक्षित चढ उतारासह वेगवेगळ्या वळणांची ती वाट पुढे सरकू लागली होती. जून महिन्याचा पहिला आठवडा असल्याने वातावरणात ढगांचा चाललेला खेळ क्वचित आम्हाला बघायला मिळत होता. काही ठिकाणी वनराई इतकी घनदाट होती की तिकडे अगदी अंधार पडल्यासारखा भास होत होता. ऐतिहासिक गप्पांमुळे रायगडाचा इतिहास सतत कानी पडत होता. बोम्बल्या दादाचे काही कधी न ऐकलेले अनुभव आनंददायी होते. नाईकवाडी सर मजल-दरमजल करित जड पावलांनी आमच्या सोबत अगदी शांततेत चालत होते. दिवस संपत आला होता, संध्याकाळ झाली होती, आता मात्र सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अशा वेळी एक खडी, मुरमाड निसरडी चढण आमच्या समोर आली. घामाने अक्षरशः अंघोळ झाली होती. चढ चढल्यावर मात्र सर्वांनी तिथे काही काळासाठी पडी मारली.
७ वाजून गेले होते. सर्वत्र बऱ्यापैकी अंधार पसरला होता. रातकिड्यांचा किर्र्र कानात जाणारा आवाज, वटवाघळांची धडपड, झाडावर विसावलेल्या विविध पक्षांचा आवाज कानी पडत होता. रात्र झाल्याने आम्ही नक्की कुठे आलोय कळायला काही मार्ग नव्हता. टकमक पार करून बराच वेळ झाला होता. अंदाजे भवानी टोकाच्या अगदी खाली आम्ही आलो होतो. नाईकवाडी सरांची चांगलीच दमछाक झाली होती. पाण्याच्या मोजक्याच बाटल्या शिल्लक राहिल्या होत्या. भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेत आम्ही पुन्हा प्रदक्षिणा चालू केली. चढण चढल्यावर कुठेतरी पुन्हा उतरावे लागणार होते. उतरणीवर चालण्याचा वेग जरा वाढला होता. जंगलाची घनदाटता एवढी होती की आम्ही नक्की रायगड पायथ्याशी आहोत की नाही याचादेखील संशय आम्हाला आला. दिशादर्शक बाणांमुळे प्रदक्षिणा सुकर झाली होती, नाहीतर रात्रीच्या त्या भयाण अंधारात योग्य वाट शोधत प्रदक्षिणा पूर्ण करणे अगदी अशक्यप्राय गोष्ट आहे. पुढे काही अंतर चालल्यावर चांदोमामा नजरेस पडले. रायगडाच्या दिशेला पाहताच rope way दूर कुठेतरी नजरेत आला. त्यावेळी कुठे थोड्याफार प्रमाणात अचूक दिशेचा अंदाज आम्हाला आला.रात्रीच्या काळोखात रायगडाचा परिसर अतिशय भयाण भासत होता. आता मात्र काही काजव्यांनी आमची साथ धरली होती. रात्रीचे ८.३० वाजले होते. वाघ दरवाजाच्या अगदी खालच्या भागापर्यंत आम्ही पोहोचलो होतो. पोटात कावळे ओरडण्यास सुरवात झाली होती. आता कुठे चालताना ढग वगैरे दिसु लागले होते. प्रदक्षिणा चालू करताना मोठ्या हौशेने घेतलेला फणस तसेच काही आंबे आता निव्वळ ओझे वाटू लागले होते. अजून बरेच अंतर चालायचे होते. प्रदक्षिचा मार्गदेखील चालणाऱ्याची कसोटी पाहणारा होता.
कधी चढ, कधी उतार, कधी अगदी अरुंद पायवाट तर कधी विस्तीर्ण वाट, कधी मोठे-मोठे दगड तर कधी मुरमाड घसरण. चालणाऱ्याचा चांगलाच कस लागेल अशी ही प्रदक्षिणेची वाट तुडवत रात्रीच्या वेळी रायगड पायथ्याच्या ओढीनं आम्ही चौघे पुढे जात होतो. प्रदक्षिणा चालू केल्यापासून पहिल्यांदाच आम्हाला मैदानी भाग लागला होता. आता मात्र या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतला होता. थोडासा आराम मिळताच डोक्यात सुपीक विचारांचे सत्र सुरू झाले. काजव्यांनी आपल्या संख्येमुळे आता आमच लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं होतं. मनात विचार आला म्हंटलं," काय रे बोम्बल्या दादा आजच्याच दिवशी ३४० वर्षांपूर्वी काय बरं चाललं असेल रायगड आणि आसपासच्या परिसरात. जनतेच्या राजाचा राज्याभिषेक पुढल्या दिवशी असल्या कारणाने किती बरं खबरदारी घेतली जात असेल ?? एवढ्या मोठ्या सोहळ्याच्या तयारीची कामे अगदी युद्ध पातळीवर सुरू असतील, नाही का ?? आणि अस सर्व करताना मावळ्यांच्या मनात जी भावना असेल ती जगातल्या कोणत्याही इतिहासकाराला वर्णन करता येईल का ?? " त्यावर बोम्बल्या दादा म्हणाला," अगदी खराय तुझं आयुष्यातील काही क्षण मनमुरादपणे अनुभवायचे असतात. आणि मावळ्यांच्या मनातील भाव तर अवर्णनीय असणारच! मुघली व इतर तत्सम सत्तांच्या विळख्यातून सामान्य जनतेला सोडवून रयतेचा राजा सार्वभौम होणार होता तर मग अशा वेळी मावळ्यांची चाललेली धडपड, रयतेच्या गोटात असणारा आनंद हा अगदी भव्य दिव्यच असणार. " या व अशाच आणखी काही विचारांचे मंथन करताना एक तास कधी निघून गेला काही कळालेच नाही.
आता मात्र ९.४५ झाले होते. पुढे चालण्यासाठी बरच अंतर बाकी होतं. अगदी जड पावलांनी तिथून काढता पाय घेतला तो प्रदक्षिणा पूर्णत्वाय नेण्याच्या दृष्टिनेच. आता सगळेच बऱ्यापैकी charged up झाले होते. पाय पटापट चालू लागले होते. काजव्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. आता कुठे वारा आमच्या सोबतीला आला होता. सह्याद्रीच्या सानिध्यात जवळ-जवळ ६-७ तास आम्ही चालत होतो. आता पायवाट बरीच रूंद झाली होती व तिचे रूपांतर जुन्या खडकाळ डांबरी रस्त्यात झाले होते. आता rope way अगदी स्पष्ट दिसू लागला होता. तेवढ्यात समोर एक अनोखा नजारा आमच्या वाटेस आला. २ मध्यम उंचीची झाडे एकमेकांच्या अगदी जवळ उभी होती. रात्रीच्या त्या काळ्या कुट्ट अंधारात जणू काही फांद्यांना काजव्यांची पाने लगडली होती. हातात असलेल्या विजेरी बंद करून आम्ही स्तब्ध उभे ठाकलो. काजव्यांच्या त्या समुहाने जो काही निसर्गाविष्कार आमच्यासमोर सादर केला तो बघताना आमच्या सगळ्याचे भान हरपून गेले. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ते सगळे काजवे एका ठरावीक वेळेने प्रज्वलित होत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात काजव्यांचा तो खेळ बघण्यात जो आनंद मिळाला त्यात प्रदक्षिणेमुळे झालेल्या त्रासाचा पुर्णपणे विसर पडला. आमचा तर पाय तिकडून हलतच नव्हता त्यामुळे तिथेच बसून जेवण करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अशा या अतिशय सुंदर आविष्काराच्या समक्ष केलेले त्या जेवणाची सर अगदी कशा-कशालाच येणे शक्य नाही. प्रदक्षिणा सार्थक लागली ती या एका घटनेने. पुढे आल्यावर आम्हाला rope way चे दर्शन झाले. दुसऱ्या दिवशीच्या राज्याभिषेकासाठी स्वतःला शिवभक्त म्हणविणाऱ्यांची गर्दी फार झाली होती. दारू ढोसून, महारांजांना मित्राप्रमाणे संबोधत काही बेताल टाळकी गडाच्या दिशेने निघाली होती. कानावर अशा कितीतरी आक्षेपार्ह्य गोष्टी पडत होय्या पण अशांना दुर्लक्षित करण्याचा उपाय करित आम्ही चित्त दरवाजापाशी जाऊन थबकलो.
प्रदक्षिणा पूर्ण झाली. वाटेत नव-नवीन किटक, प्राणी, पक्षी, वनस्पती, माणसं यांची ओळख झाली. निसर्गाविष्कार, ऐतिहासीक, सामाजिक गोष्टींवरील चर्चाही झाल्या. पण शेवटाला मात्र कपाळकरंट्यानी राज्याभिषेक सोहळ्याचे राजकारण करून त्याची लया कशी बिघडवली आहे ते लक्षात आल्यावर तेवढच वाईटही वाटलं. असो. सह्याद्रीचे आणखीन एक गूढ उकलताना बरीच मजा केली व अनुभवाची शिदोरी गोळा केली. बोम्बल्या दादा, नाईकवाडी गुरूजी, माझा भाऊ गणेश यांची साथ आणि हा सर्व प्रवास या गोष्टी माझ्या सदैव स्मरणात राहतील.
Comments
Post a Comment