Skip to main content

काळदुर्ग - अपरिचित किल्ल्याची सफर

गेल्या दोन वर्षापासून उत्तर कोकणातील किल्ल्यांनी मला भुरळच घातली आहे . डहाणूपासूनच वसईपर्यंतच अथांग समुद्रकिनारा लाभलेल्या या भागात जलदुर्गाप्रमानेच डोंगरी किल्ल्यांचीही सुमृद्धी लाभली आहे .या भागातील सर्वचा सर्व जलदुर्ग तशेच प्रेक्षणीय स्थळे भटकून सुरवात केली ती येथील डोंगरी किल्ल्यांच्या भेटीची.सर्वात आधी सुरवात केली ती वसईच्या कामणदुर्गापासून मग विरारच्या टकमक किल्ल्यापासून मग तांदूळवाडी, आशेरी,आणि स्वच्छता मोहिमे प्रसंगी बोईसरजवळील असावा किल्ल्याची .खरेतर प्रत्येक डोंगर भेटीत जुन्या नव्या मित्रांची साथ भेटत गेली. कारण उगीचच बोंबलत फिरायला आपल्या गाठीतला पठ्ठ्या प्रत्येकाला हवा असतोच . आतापर्यंत पाहिलेल्या सर्व गडकिल्ल्यांची तहान मित्रांसमवेत भागविण्यात वेगळीच मजा असते. वह "मेरेको इच मालूम है". 

तर विषय असा कि गेल्याच्या गेल्या आठवड्यात (म्हणजेच परवा आठवड्यात :P) विक्रांत पुन्हा समुद्रामध्ये मासे मारण्यासाठी जाणार अशी कानकून (कानावर नाही) वाट्स अप वरच्या ग्रुपवर लागली. आणि खर सांगतो हे वाचताच माझी अक्षरश : उदास झाली . "कसमे वादे निभायेंगे हम ",वादा करले साजणा",वादा राहा प्यारसे प्यारसे का" कसलं काय काय "शपथ तुला रे"अश्या गाण्यांची मैफिल डोक्यात सुरु झाली. १९ तारखेची शिवजयंती उरकून या सायबाला सोबत घेऊन ३ दिवस सह्याद्रीच्या सान्निध्यात घालवायची स्वप्ने अक्षरशः धुळीत मिळाली.पुसली गेली. पाण्यात विरघळली .(अतिशयोक्ती म्हणतात याला जे सगळेच लेखक, कवी आणि हो इतिहासकार देखील त्यांच्या लेखनात करतात.)

एवढी खटपट करून बॉसकडून चार दिवस काढलेल्या सुट्टीचे चार चांद लावण्याच्या जागी चार घो ..... लागले. त्यात ऐनवेळी कामाचा व्याप वाढल्याने सुट्टी पण केन्सल होते कि काय याची भीती वाटू लागली. असल्या सरभरित झालेल्या मनाचे आल फकस्त शिवजयंती साजरी करणे हाच निर्णय घेतला, १८ तारखेला पहाटेच्या वेळेस विक्रांतने कोणालाही न भेटता कल्टी मारली. त्यामुळे मी, विठ्ठल ,बापू ने त्याचा चांगला उद्धार केला.( तो सुमडीत रुपेशला भेटून गेला हे शिवजयंतीच्या दिवशी कळले.) 

१८ तारखेची संधाकाल उजाडली. दादर स्टेशनच्या स्वामीनारायण मंदिराजवळ पिवळ्या लाईट च्या डांबाखाली सर्वात आधी (दरवेळेस मीच पहिला येतो) येउन उभा राहिलो. रुपेश आला. त्यानंतर हळूहळू मंडळी येत गेली. मच्छराणी माझ अंदाजे 50ml तरी पोटभर रक्त पिउन डांबाखालील इतर मुलांकडे फ़ोज वळवली होती. गाडी आली. गाडीत बसलो. दंगा,धुडगूस घालत,पेंगत त्र्यंबकेश्वर गाठलं. 

१९ फेब्रुवारी चा दिवस उगवला. खर तर महाराष्ट्राच्या शिव सूर्याचा तो जन्मदिन आम्ही या वर्षी नाशिकच्या आधारतीर्थ आधारश्रम येथे साजरा करायचा ठरवला.सगळ नियोजन व्यवस्थित पार पाडत यंदाची शिवजयंती या आश्रमातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसोबत शिवरायांच्या विचारांचा प्रचार करत धूमधड्याक्यात ,तितकीच गहिवरल्या डोळ्यांनी साजरी केली. या अविस्मरणीय क्षणाबद्दल लिहित गेलो तर पुस्तक तयार होईल. थोडक्यात सांगायचे झाल्यास खूप आनंदात हा दिवस गेला.नवी जुनी मित्र मंडळी भेटली.काहींची नव्याने ओळख झाली .पुन्हा धमाल मस्ती करत परतीच्या वाटेला लागलो. 

रात्री ११.३० वाजता घरी पोचताच टीव्ही वर news channel वर गोविंद पानसरेनच्या निधनाबद्दलच्या वार्ता झळकू लागल्या.विद्रोही विचारधरणीच्या नेत्याचा निर्घुणपाने खून करण्यात आला.आणि माझ्यासारखी अनेक सामान्य माणस मस्तपैकी तंगड वर करून झोपी गेली."दुनिया गयी तेल लगाने अपने को क्या किसीका .............."

असो... दुसरा व तिसरा दिवस निवांत घरात बसून "साजरा" केला... तेवढंच दोन दिवस प्वार घरात हाय म्हणून आमच्या आईसाहेबांनाही खूप बर वाटल... पण माझ मन काय घरात निवांत बसू देईनास झाल होत... शनिवारी संध्याकाळी रूप्स ला message करून भटकायचा प्लान सांगितला. तो पण तयार झाला ना भो...!! एका दिवसात फिरून येण्यासारखं ठिकाण म्हणजे कर्जत,बदलापूर,पनवेल, लोणावळा या शहराजवळील 'गजबजलेले' किल्ले... सध्या या सर्व ठिकाणी आजकाल नुसती जत्रा भरलेली असते... त्यामुळे रविवारच्या दिवशी उगीच तिथे जावून शांत, एकांत चित्ताने फिरणे काही होणार नाही हे माहित होते.. आणि म्हणूनच 'वरीलप्रमाणे.. :D ' उत्तर कोकणातला पालघर या नव्या जिल्ह्यातील एका दिवसात फिरता येणारा "काळदुर्ग" या अपरिचित किल्ल्याची सफर करण्याचा बेत ठरला...

रविवारी सकाळी रुपेशला ६:३० वाजता अंधेरी स्टेशनाला भेटायला सांगून मी ७:१३ ला हजर झालो.. (हे आमच नेहमीचच असत.. :p ) विरार लोकल पकडली.. पावून तासात विरार स्टेशन गाठले.. एव्हाना ७:४० ची शटल आमची वाट पाहून गेली होती... यानंतर थेट ८:३५ ला ट्रेन होती... जोरात भूक लागली होती... स्टेशनच्या आसपास खिशाला आणि पोटाला परवडेल अस हॉटेल शोधलं.. ऑर्डर देवून पोटात "मेंदू" वडा सारला... लगोलग ५ मिनिट आधी स्टेशनात हजर होवून भरगच्च गाडीत उभा राहू शकेल अशी जागा मिळवली (मी सफाळे स्टेशन येईपर्यंत अंतराळी होतो).. तर रुपेस मस्तपैकी बाहेर लटकत होता... विरार सोडलं... तसा हवेतला गारवा भासू लागला गाडीत वार शिरलं... आणि मेरेको सुकून मिल गया... (गाडीतल्या गर्दीमुळ दुसर्यांदा अंघोळ केली होती) निसर्गरम्य उत्तर कोकणची वाट सुरु झाली होती... नारळी फोफळीच्या चिकू केळीच्या बागा, डौलदार घरे, बंगले, पळस सागाने भरलेले डोंगर कोकणातल्या अशा निसर्गसंपदेच दर्शन देत गाडी पुढे पुढे चालली होती...


वैतरणा, सफाळे, केळवे ही स्टेशन मागे सारत ९:१० वाजता पालघरात दाखल झालो... गाडीत अनुभवलेला गारव्याने सुर्याबाशी दोस्ती करून कडक उनाचे रूप धारण केले होते... इतक्या सकाळ सकाळ आमच्या गालावर मानेवर बेकार चटके लागायला सुरुवात झाली होती यापुढे काय होणार याची चांगलीच जाणीव झाली होती... स्टेशनाच्या बाहेरच पोटापाण्याच घेतलं... गेल्या वेळेस अशेरीगडाला जाताना स्टेशनापासून लांब अंतरावर जेथून टमटम पकडली होती त्या ठिकाणी जावून विचारले असता त्यांनी स्टेशनपासून गाड्या आहेत म्हणून सांगितले. शेवटी एवढी केलेली तंगडतोड काही कामाची झाली नाही. मी आधीच विचारायाला हवे होते. असो. परत मागे येवून स्टेशनातून भाडोलीकडे जाणारी टमटम पकडली. जेमतेम १५ रुपडे घेवून गाडीवाल्याने वाघोबा खिंडीत पोहोचवले.

मनोरकडे जाणाऱ्या वाटेतल्या छोटुश्या या घाटात "वाघोबा" हा येथील आदिवासी लोकांचा देव आहे... मंदिरालगतच एक छोटेखानी हॉटेल आहे... सदर घाटरस्त्यात जवळपास कोठेही लोकवस्ती नाहीये. फक्त गाड्यांचा, झाडांचा आणि पक्ष्यांचा आवाज... विसाव्यासाठी तसेच वाघोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी लोक येथे थांबतात.. मंदिराबाहेर माकडांची मात्र वर्दळ भरपूर आहे.. मंदिराच्या एका भिंतीवर "जय वाघोबा" लिहिलेले वाचल्यावर चटकन आमच्या "अनिकेत वाघ" ची आठवण झाली... तो सध्या वाघ मारायला दुबईला गेलाय... 

गडाकडे जाण्यासाठी उजव्या बाजूने वाट आहे.. ती लगेच ओळखून येते.. परंतु लोकांची कमी वर्दळ आणि प्राण्या चोरांची भीती इथेही आहे का हे विचारण्यासाठी हॉटेलातल्या मावशीला आवाज दिला... तशा त्या मावशी नाकात तपकीर टाकत बाहेर आल्या. कुठून आलात बारीक सारीक विचारपूस केली. आम्हीही विचारपूस करायला सुरुवात केली असता "गडावर सकाळी ८ जणांचा ग्रुप गेलाय अस सांगितले.. पोर मस्तीखोर दिसतायत जपून जावा... इकडे चोरया खूप होतात... गेल्या महिन्यात एका पोराला इकडच्या स्थानिक मुलांनी लुटले होते... हातात काठी किंवा दगड घेवून वर जावा..." असा या मावशीचा सल्ला मिळाला... :/ 

हे सर्व ऐकून आमची पाचावर धारण बसली होती म्हणजेच जाम फाटली होती... :D १० मिनिटात आम्ही उजव्या बाजूने गडावर जाणाऱ्या वाटेला लागलो... अगदी चीर जंगल शांतता, पक्षांचा किलबिल आवाज आणि मधेच आम्हास घाबरून पालापाचोल्यात फरफटत जाणाऱ्या सरड्यामुळे होणारा आवाज शहरातल्या गोंगाटापेक्षाही भयानक वाटत होता... मधेच मोठ्या वाहनाचा आवाज आम्हाला ओळखीचा वाटत होता... १५-२० मिनिटे चालल्यावर आमची कॅमेरे बाहेर काढून फोटो टिपायला सुरुवात झाली होती.. मावशीने सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा हातात एक कारवीच्या झाडाची काठी घेतली होती... :D अर्धा पावून तास चालल्यानंतर एका मोठ्या पठारावर थोडीशी विश्रांती केली. तेवढ्यात सकाळी गडावर गेलेल्या मुलांचा आवाज ऐकू येवू लागला.. हळूहळू कानोसा घेत आवाज नेमका कुठून येतोय याची खात्री घेत त्या दाट जंगलात पुन्हा शिरलो... परत थोडे अंतर पार केल्यावर त्या मुलांचा आवाज येवू लागला.. तेव्हा पुन्हा कानोसा घेतला असता ती मुल किल्ल्यावर फोटो काढण्यात मश्गुल होती... आता किल्ला नीटसा दिसत होता.. किल्ल्यावरील मुलेही दिसत होती.. पायथ्यापासून ते इथपर्यंत त्या मावशीच्या बोलण्यामुळे एक वेगळीच धास्ती घेतली होती.. आता थोडस हायसे वाटू लागले होते.. किल्ल्याकडे जाताना एक घळ लागली ती पार करत वर चढलो... तेव्हा वर गेलेल्या ८ मुलांनी गड उतरायला सुरुवात केली होती.. इथूनच किल्ल्यावर जाताना निवडुंगाचे जाळे आहे त्याबजूस एका मोठ्याला कातळावर डोक टेकवून पालघरचा परिसर न्याहाळत बसलो... इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या... बापू, विठ्ठल आणि विक्रांतची आठवण काढत काही ट्रेकच्या आठवणी जाग्या केल्या व परत उजव्या बाजूला traverse मारत शेवटच्या टप्प्यावर पोचलो.. वर गेलेली मुल धडपडत हळू हळू खाली येत होती.. एका वेळेस एकाच व्यक्ती जावू शकेल अशी वाट असल्याने आम्ही अलीकडेच थांबून त्यांना जाण्यासाठी वाट करून दिली.. मुल बर्यापैकी मस्तीखोर होती... बोलण्यावरून ती पालघरचीच स्थानिक वाटत होती. त्यातल्या एकाच्या हातात "गावठी कट्टा" पाहिल्या पाहिल्या जरासा घाबरलो. मी आणि रुपेश एकमेकांकडे पाहून पुन्हा त्या उतरणाऱ्या मुलांकडे पाहत होतो. किल्ल्याची माहिती माहित असतानाही दचकून त्यातल्या एकाला उगीच प्रश्न केला "किल्ल्यावर मंदिर आणि गुहा आहे का ?" त्यानेही साजेसे हिंदीतून उत्तर दिले.. ती सगळी टवाळखोर मुल उतरली.. अजून बरे वाटले.. 



किल्ल्यावर जाणारी ती थोडीशी निसरडी वाट पार करत किल्ल्यावर एकदाशी पोचलो व गड फिरण्यास सुरुवात केली. घड्याळात ११:३० वाजले होते दीड तासात गडावर पोचलो होतो. गडावर तटबंदी नाही किंवा बुरुज देखील नाही. टेहळणीसाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असावा. तसेच गडावर मोजून पाण्याची तीन टाकी आहेत.. थोड्याशा नेस्तनाबूत झालेल्या कोरीव पायऱ्या खेरीज काही नाही... मात्र जवळचा परिसर मन मोहून घेतो... या काळदुर्गावरून सफाळे, केळवे, पालघर,बोइसर शहर तसेच जवळचा असावा किल्ला, अशेरीगड, कोहोजगड दिसतो... वातावरण स्पष्ट असले तर समुद्रकिनारादेखील पाहता येतो... पोटभर फोटो काढत मंदिराकडे जाण्यासाठी खाली उतरलो... थोडेसे खाली उतरलो कि गडदेवतेचे एक भग्न मंदिर दिसले... मानेपासून भग्न केलेला नंदी, दोन भग्न शिवपिंडी अस्ताव्यस्त पडलेले काही दगडात कोरलेले देव, भोवताली दगडधोंडे रचून यांना एकत्र करून ना छप्पर ना भिंती नसलेले हे गडदेवतेचे मंदिर पाहून मन हेलावते... हा किल्ला किती जुना असावा याची साक्ष मंदिरातील या पुरातन वास्तू करून देतात... असाच इतिहासाचा जागर करत आम्ही पुनश्च किल्ल्यावर आलो.. मेंदूवडा कधीच जिरला होता... आता लय भूक लागली होती... वर येवून तिथेच सुकलेल्या पाण्याच्या टाकीशेजारी थोडावेळ पथारी पसरली आणि वडापाव संत्रीवर आक्रमण करीत पोटभर जेवलो... मग पुन्हा थोडेसे फोटो.. चर्चा.. परतीच्या मार्गी सुरुवात...



अंदाजे दीड वाजता आम्ही उतरायला सुरुवात केली.. गड अगदी छोटेखानी असल्याने साधारण १ तासात फिरून होतो.. 

जय वाघोबा... _/\_

ता.क. :- बरेचसे फोटो रुपेश सरांच्या कॅमेऱ्यात टिपले होते.. परंतु त्यांच्या मेमरी कार्ड मधील फोटो वाघोबा खिंडीतल्या भुताने पळवून नेले..  :D

Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...