Skip to main content

भटकेहो जरा इकडे लक्ष द्या..!!!

आपल्या महाराष्ट्रात यंदा मस्त तुफान धुमधडाक्यात पावसाल  सुरु झाली. सुकलेले तलाव, नदी, नाले, ओढे, धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत.. कोरड्याशार निसर्गाचं रुपडं काही दिवसातच पालटून हिरवगार झालय.. सह्याद्रीतील अनेक सुप्रसिद्ध स्थळांना, गडकिल्ल्यांना भेटी देण्यासाठी दर शनिवार - रविवारी पर्यटकांची रेलचेल चालू झाली आहे. अशा हिरव्याशार निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी तरुणाई भटकंतीसाठी आपली पावले सह्याद्रीकडे वळवीत आहेत.. परंतु सद्यस्थितीत या वर्षी जोरदार पाऊस पडत असल्याने कसलीही पर्वा किंवा पूर्वनियोजन न करता याच तरुणाईचा अतिआत्मविश्वास सह्याद्रीतील अनेक ठिकाणी होणाऱ्या अपघातांना बळी पडत आहे.. आणि बहुतांशी अपघात किल्ल्यावर व त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी होत आहेत असे दिसून येतेय. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असे अपघात होत आहेत त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना याचा त्रास सुरु झाला आहे. अपघातास बळी पडणारे जखमी होणारे जास्तीत-जास्त लोक हे अमली पदार्थाचे सेवन किंवा मद्यप्राशन करून आलेले दिसून येतात... डोंगर उतारावरील ओढे, नाले व धबधब्यांच्या ठिकाणी या घटना घडत असताना दिसत आहेत. आणि अशाच ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत.  काही दिवसापूर्वीच पोलिसांनी अशा कित्येक अपघातग्रस्त  धबधब्यांच्या ठिकाणी बंदी घातली आहे. अशा हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांमुळेच तिथल्या परिसरावर वाईट परिणाम होत आहे आणि  यावर सर्व नवयुवकांनीच विचार करायला हवा.

सह्याद्री म्हंटले कि गडकिल्ले आलेच. पण गडकिल्ल्यांचा उपयोग आजकालची तरुणाई मनोरंजनासाठी, सहलीसाठी किंवा मौजमजेसाठी करते आहे असे दिसते. तसे न करता इतिहास अनुभवण्यासाठी तो जगण्यासाठी आजच्या तरुणाईने गडकिल्ले भ्रमंती केली तर वावगे ठरणार नाही.

पावसाळा सुरु झाला कि बहुतेक जणांच्या डोक्यात ट्रेकिंगचे फ्याड येते. मग अशा हवशी मंडळींची पाऊले सह्याद्रीकडे वळतात.  गडकिल्ल्यांवर, डोंगरात, जंगलात फिरण्याचा अजिबात अनुभव नसलेले हवशी ट्रेकर मंडळी काळवेळ, पूर्वनियोजन, परिसर माहिती , अपुरे साहित्य अभावी अशा अनेकांना सह्याद्रीच्या राकट स्वभावाला सामोरे जावे लागते. अशामुळे काही प्रसंग घडतात.
१) वाटा चुकणे
२) पाऊस व तत्सम निसर्ग बदल झाला असता वाटेत अडकने. (ओढ्याला पूर, पायवाट खचणे, दरड पडून वाट बंद पडणे)
३) अपुरे साहित्य असणे (प्रस्तरारोहण साहित्यसोबतच कमी अन्नपुरवठा,)
४) घरातील व्यक्तींना किंवा मित्रांना ज्या ठिकाणी जात आहोत त्याची माहिती न देणे.
५) बचाव कार्यातील मंडळींचा संपर्क क्रमांक नसणे.
६) स्थानिक परिसरातील वाटाड्या न घेणे किंवा स्थानिकांकडून परिसराची माहिती न घेणे तसेच त्या ठिकाणचा नकाशा नसणे.
७) मेडिकल किट/ प्रथमोपचार पेटी नसणे.


अशा कितीक गोष्टींअभावी अपघात व जखमी होण्याचे प्रकार घडतात. माझ्या अनुभवानुसार व वाचलेल्या काही माहितीप्रमाणे ट्रेकिंगला जाताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची नोंद देतो आहे.

*  ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती इंटरनेट मार्फत पुस्तकांमार्फत किंवा तुमच्या ओळखीतील जे मित्र त्या ठिकाणाला भेट देऊन आले आहेत त्यांच्या अनुभवानुसार यांसर्वांमार्फत माहिती गोळा करा. तसेच त्या ठिकाणाचा मॅप/नकाशा सोबत ठेवा.

*  गडावर किंवा घाटवाट असेल तर जी मळलेली वाट आहे त्याच वाटेने मार्गक्रमण करत रहा. माथ्यावर लवकर पोहोचायचे आहे म्हणून अवघड वाटांचा उपयोग किंवा धाडस करू नका. निसरड्या वाटांचा अजिबात वापर करू नका.  अवघड मार्गापेक्षा सोप्पा मार्ग कधीही उत्तमचं.

* जंगलातील वाट असल्यास आणि चुकण्याची शक्यता वाटल्यास, चालता चालता मार्गक्रमणातील एखाद्या झाडावर किंवा दगडावर खुणा करत चला. (एकावर एक असे २-३ दगड रचून ठेवा, झाडाला/फांदीला रंगीत दोरी बांधणे , ऑइल पेंट किंवा खडू, चुना इ.) जर पुढे जाऊन मार्ग चुकलात तर याच वाटेने मागे फिरण्यास सोपे जाते व वाट भरकण्याची शक्यता कमी होते.

* परिसराची काहीच माहिती नसल्यास स्थानिक वाटाड्या सोबत घ्या किंवा परिसराचा अनुभव असलेली व्यक्ती सोबत असल्याशिवाय शक्यतो जाणे टाळा. तुम्ही हरवला आहात आणि ७-८ जण असलात तरीही वाट शोधण्यास खूप त्रास होतो. वाट शोधण्याच्या घाईत बरेचजण पांगले जातात. त्यात अर्ध्यांना पुन्हा शोधण्यात वेळ जातो. जंगलात भटकंतीसाठी मुळात "वेळ" हि सर्वात महत्वाची मानली जाते.

* हरवला असाल तर जास्त कन्फ्यूज होऊ नका. शांत विचाराने परत मार्ग शोधायला सुरु करा. त्याचबरोबर मोबाईलवर जीपीएस सुरु करा. नकाशा असेल तर जेथे आहोत त्या ठिकाणाचा अंदाज घेत रहा आणि शेवटी अतिप्रसंगी थेट बचावयंत्रणेतील कार्यरत संस्थांना फोन करा.

*  स्वतःजवळ ३-४ लिटर जास्तीत-जास्त पाणी बाळगा. सुका खाऊ, खडीसाखर चॉकलेट सोबत ठेवा.

* पावसाळ्यात किडे-मच्छर चावण्याची जास्त शक्यता असते. त्यानुसार सोबत ओडोमॉस ठेवा. शक्यतो पूर्ण कपडे परिधान करा. साप किंवा इतर जनावरांपासून बचावासाठी सोबत एखादी काठी सुद्धा ठेवा.

* बऱ्याचदा पाय घसरणे, हाताला खरचटने इ. प्रसंग किंवा अपघात होतात म्हणून Firstaid Kit म्हणजेच प्रथमोपचार पेटी नेहमी सोबत ठेवाच.

* पावसाळयात बहुतांशी गडावर किंवा सह्याद्रीतील इतर ठिकाणी मुक्काम करणे टाळाच. गडावरील गुहेत किंवा कुठेही एका ठिकाणी मुक्काम करत असाल तर ती जागा नीट तपासून घ्या, साफ करा व मगच मुक्काम करा.

* पावसाळयात गडांवरील बुरुजांवर चढणे, कड्यावर उभे राहणे शक्यतो टाळाच. फोटो घेणाच्या मोहाला आवर घाला. त्यात "सेल्फी" हा सध्या अपघाताचा मुख्य स्रोत झाला आहे.

* गडावरील पाण्याचे टाके शुद्ध राखणेस सहकार्य करा. त्यात कचरा करणे, पोहणे टाळाच. कारण याच पाण्याचा उन्हाळ्यात इतर ट्रेकर्स व गडाखालील स्थानिक लोक (जवळ पाणी संपल्यास) प्रसंगी पिण्यासाठी उपयोग करतात.

* गडकिल्ल्यांचा वापर सहलीसाठी हुल्लडबाजीसाठी करू नका. त्यांचे पावित्र्य राखण्यास मदत करा.

* सरतेशेवटी एकच सांगेन कि, भटकंती करत असताना योग्य ते पूर्वनियोजन करा. वेळेचं, हवामानाच, भान ठेवा.. निसर्ग आणि सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो रौद्र देखील आहे. अतिआत्मविश्वास, अतिउत्साह आणि आततायीपणा टाळा.

- जातिवंत भटका


Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...