Skip to main content

अपरिचित मराठवाडा । भाग : १

या ३ दिवसाच्या प्रवासाची सुरुवात नक्की कशी व कुठून करावी हे आता लिहिताना सुचत नाहीये. ऑगस्टमध्ये झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती नंतर काही महिने? आराम करावा, आता घरादाराकड अन कामाकडं लक्ष द्यावं, दुनियादारी बंद करून संसाराला लागावं वैगेरे विचार येऊन गेला. त्यानुसार दोन महिने पूरेपूर प्रयत्न केला गेला. आज्याबात कुठंच गेलो नाही असं म्हणताना आज स्वतःलाच हसू येतंय. सप्टेंबर मध्ये प्रथमोपचार शिबीर सोडलं तर कुट्टच गेलो नव्हतो. 
मागच्या महिन्यातच बाकीच्या टाळक्यांचा दसऱ्या निमित्त यावर्षी मराठवाडा भागातील भुईकोट किल्ले भ्रमंतीचा प्लॅन ठरला होता. दसरा, रविवार आणि गांधीजींची जयंतीनिमित्त लागोपाठ आलेली सुट्टी, तीन दिवसाच्या  प्रवासाच ठरलेलं नियोजन. 
महिनाभर आधी ठरलेल्या या ट्रेकला न जायचाच ठाम निर्णय घेतला होता. गेल्याच आठवड्यात धाडकन या निर्णयाचा इस्कोट झाला. शेवटच्या घडीला या ट्रेकला जायचच हा निर्णय अंमलात आणला. स्वतःसाठी वेळ काढत जमेल तसं मी सह्याद्रीत फिरतोय. आतापर्यंतच्या या प्रवासात मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व कोकण पाहिलं होतं पण मराठवाडा परिसर आजवर पाहिला नव्हता व तसा योग आलाच नव्हता. मराठवाडा पाहायची ओढ बऱ्याच वर्षांपासून होती. इथले कित्येक वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले भुईकोट किल्ले, समरभूमी, प्राचीन मंदिरे, लेण्या, इथले लोकजीवन जवळून पाहायचे दिवावत असे स्वप्न होते आणि ते या तीन दिवसांच्या मोहिमेत पूर्ण होणार होते. 
चार दिवस आधी साधेसुधे नियामक मंडळाला होकार दिला. विशाल पेडणेकरांनी डच्चू दिल्याने त्यांची सीट माझ्यानावे झाली. सगळ्या गोष्टी अचानक ठरल्याने आधाश्यासारखी बॅग भरली आणि ठाण्याहून ट्रेनला बसायचे ठरवून सेकेंड शिफ्ट घेऊन घरातून हाफीसाकडे निघालो... खारघरहून निघता क्षणीच कानावर बातमी आली की एल्फिन्स्टन रोडला मोठी चेंगराचेंगरी झाली काही लोक मृत्यूमुखी पडले तर काही जखमी झाले. तेवढ्यात इंटरनेटवर फोटो, व्हाट्सएपच्या बऱ्याच ग्रुपवर त्या घटनेचे व्हिडीओ वायरल झाले. त्या भयाण अपघाताचे एक दोन फोटो पाहून डोक्यात मुंग्या गेल्या. आता शिव्या द्यायच्या तर कोणाला ? त्या येडझव्या गर्दीतल्या माणसांना की सरकारला ? त्या घटनेचा निषेध करावा तरी कसा ? बऱ्याच प्रश्नांच्या फैरीत पंधरा मिनिटे स्टेशनवर बसून राहिलो शांत झालो. गेल्याच आठवड्यात प्रथमोपचार शिबिरात शिकवलेल्या विषयांचा पाढा वाचला. फलाटावर ट्रेन आली आणि बसलो व त्याच उद्वेगाच्या तंद्रीत इतरांप्रमाणे फेसबुकवर निषेधाच्या लढ्यात उडी घेतली. जखमी झालेल्या लोकांना रक्ताची तातडीची गरज होती. तिकडे जायचा विचार डोक्यात चालू असतानाच अनिकेत व नितीनची पोस्ट पहिली. त्याचवेळी परळ भागातच राहणारी सचिन कदम व सुदक्षिणा ही दोघ स्वेच्छेने पुढाकार घेऊन रक्तदानाकरिता  हजर झाले सचिनने हॉस्पिटलमधल्या वातावरणाची माहिती दिली. एव्हाना बरीच मदत आली होती व रक्ताची गरज भासणार नव्हती व जे आले होते त्यांची नावं घेऊन गरज भासल्यास बोलावू असे कळविण्यात आले. सर्व खात्री करून कुर्ल्यात उतरून दिशा घाटकोपरकडे वळवली. 
एक वेगळीच निराशा मनात निर्माण झाली होती. उद्याच्या मोहिमेचा मूड गेल्या काही तासातच भंग पावला होता. मेट्रोत बसलो. Ac च्या हवेने थोडं थंड झालो. रुपेशला फोन करून आझादनगर स्टेशन वर बोलावलं अन त्याच्याकडे सॅक देऊन हात हलवत ऑफिसात पोचलो. रात्री अकरा वाजता सिद्धेश्वर एक्सप्रेस ने सोलापूरकडे निघायचं होतं. ऑफिसात एकटाच असल्याने डोक्यात काहूर माजलं होतं. काम उरकून पाच वाजता विठ्ठलला भेटायला स्टुडिओत गेलो. या साहेबांना काहीच खबर नसल्याचे कळल्यावर त्याला परत ही बातमी दिली. माणसांना अन सरकारला यथेच्छ शिव्या देऊन झाल्या. परत ऑफिसात आलो. खुर्चीवर बसलो. दीर्घ श्वास घेतला आणि मनातली घोर निराशा, उद्वेग शांत केला व शेवटी या मोहिमेला जायचा विचार मनात पक्का झाला. 
साडे अकरापासून माझ्या डोक्यात जी छर बसली होती ती काढून टाकण्याचा हा जालीम उपाय होता. उद्या या घटनेची  वेळ माझ्यावरदेखील येऊ शकते याची कल्पना रोज कुर्ला स्टेशनवरील ब्रिज चढता उतरताना गेली कित्येक वर्षांपासून होते आहे. आज किंवा उद्या काहीतरी चांगलं होईल नवं सरकार काहीतरी ठोस पावलं उचलेल याच आशेवर मुंबईकर व अखंड भारत वर्षानुवर्षे जगतोय. असो... खूप काही लिहिता येईल मनातली सगळी सल बाहेर काढता येईल पण असलं वैचारिक वैगेरे लिहायचं म्हणजे "xxx" अस मी मानतो. या भीषण चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो अशा भीषण घटना पुन्हा कधी घडू नयेत ही नेहमीप्रमाणे आशा बाळगत मोहिमेच्या सुरुवातीला मुंबईत घडलेल्या या दुःखद घटनेला इथेच पूर्णविराम देतो.


रात्रीचे 8 वाजले होते ठाण्यातून 11 ची ट्रेन पकडायची होती. ऑफिसातून लवकर जाणे भाग होते. भूक सुद्धा लागली होती. रुपेशला फोन करून येतोय असं सांगितलं आणि रिक्षा पकडून त्याच्याजागी उतरलो. दुधाची तहान ताकावर भागवत चायनीज पोटात सारल. खरतर ट्रेकला इथूनच सुरुवात झाली होती.  पावसाची रिपरिप सुरूच होती. 9 वाजले होते. ठाणे गाठायचं होत. आझादनगर ते ठाणेपर्यंतचा प्रवास आता बाईकने करायचा होता. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि पवई कडे जाणाऱ्या रोडवर चक्का जाम होता.. रुपेशने त्याच्या पद्धतीने रस्त्यातून माग काढत भिजत गारठत इस्टर्न एक्सप्रेस गाठला. अगदी १० वाजून २० मिनिटे झाली असता सुबोधच घर गाठले. अर्धेजन दादरहून तर आम्ही ठाण्यातून बसणार होतो. ११ वाजता स्टेशनवर फलाटावर पोचलो. तर आमच्यासारखेच आज फिरायला जाणाऱ्यांची गर्दीदेखील होतीच. ट्रेकर्स मंडळींच पंढरपूर असलेल्या दादर नंतर आता ठाणे हे शहर आळंदी होत आहे. या स्टेशनवर उभा राहिलेला हरेक माणूस दादरकडे टाचा उंच उंच करत ट्रेनच्या प्रथम दर्शनाची वाट आतुरतेने पाहत असतो आणि "वेळेत" आलेली ट्रेन दिसली रे दिसली की त्याला होणारा गगनात न मावणारा असतो. असो..

ट्रेन तब्बल १० मिनिटे उशिरा आली होती तोवर भेटीगाठी नमस्कार चमत्कार करीत एका अंध फेरीवाल्याकडून "हवा भरून होणारी उशी" विकत घेतली आणि 3 दिवस उशीवर झोपण्याची सोय केली. माझ्यानंतर ३-४ जणांनी उशी घेतली. घरी जायच्या वेळी अचानक उशांची विक्री झाल्यानंतर त्या दिव्यांग माणसाच्या चेहऱ्यावर झालेला आनंद पाहण्यासारखा होता. गाडी फलाटावर आली. आत शिरत आपापल्या जागा पकडल्या अन मी अप्पर सीट पकडून सगळ्यांच्या उप्परची सीटवर पाठ टेकली. रुपेशचा mp3 घेऊन गाणी ऐकत कधी झोप लागली कळलच नाही. प्रतीक्षा होती उद्यापासून सुरू होणाऱ्या यादगार ठरणाऱ्या मराठवाडा सफरीची... 

क्रमशः 

  - जातिवंत भटका

Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...